प्रति त्रंबकेश्वर कचेश्वर मंदिराच्या भिंतीचा गरूड परिवाराकडून जिर्णोध्दार
कोपरगांव / लक्ष्मण वावरे
तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण पंचक्रोशीतील प्रती त्रंबकेश्वर समजल्या जाणा-या कचेश्वर मंदिराच्या भिंतीचा जिणोध्दार भुमिपुत्र कै पुरूषोत्तम विनायक गरूड यांच्या स्मरणार्थ श्रीमती गितांजली व विजय पुरूषोत्तम गरूड परिवारांने केला त्याबददल त्यांचा गांवच्यावतीने व मंदिर देवस्थान समितीच्यावतीने सत्कार करण्यांत आला.
प्रारंभी कचेश्वर देवस्थानचे वशंपरंपरागत व्यवस्थापक पुजारी व अखिल गुरव समाज संघटनेचे राज्य चिटणीस रमेश उर्फ काशिनाथ भाउराव क्षीरसागर यांनी प्रास्तविक केले. २०११ च्या पावसाळयात कचेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते., तर पुर्व बाजुकडील भिंतही नादुरूस्त होती. सदर भिंत दुरूस्त करण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र आर्थीक अडचणींमुळे त्याचे काम रेंगाळले होते त्यासाठी शेजारीच गरूड वस्तीजवळील श्रीमती गितांजली गरूड यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सदर भिंतीचे बांधकाम करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. सदर भिंतीचे बांधकाम गुढीपाडव्या मुहूर्तावर पुर्ण करण्यांत आले. सदर बांधकामाचे लोकार्पण श्रीमती गितांजली गरूड यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेच्या उचित साधून करण्यांत आले. त्याप्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या की, कोपरगांव शहरासह तालुक्याचा ऐतिहासिक ठेवा मोठा आहे. पुरातन महत्व येथे मोठया प्रमाणांत अभ्यासावयास मिळते. प्रति त्रंबकेश्वर समजल्या जाणा-या कचेश्वर मंदिराच्या भिंतींचा जिर्णोध्दार करण्याची सेवा मिळाली हे गरूड परिवाराचे भाग्य आहे. कोकमठाण भुमित मंदिर देवस्थान समितीसह गांवक-यांनी केलेला सत्कार नेहमीच स्मरणांत राहिल. कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी कचेश्वर व मुंबादेवी तरूण मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कचेश्वर छत्रीचा जिर्णोध्दार ब्रम्हलीन रामदासी महाराज यांनी केला होता. सदर क्षेत्राचा अधिक विकास व्हावा यासाठी कोकमठाणवासियांच्यावतीने शासनाच्या तीर्थक्षेत्र योजनेतुन पाठपुरावा सुरू आहे.





