banner ads

काळे कारखान्याच्या वतीने ऊस पीक परिसंवाद व चर्चा सत्र

kopargaonsamachar
0

 काळे कारखान्याच्या वतीने ऊस पीक परिसंवाद  व चर्चा सत्र 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 - कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील कोपरगाव तालुक्यातील वडगाव-बक्तरपूर येथे आडसाली ऊस पिक व कीड नियंत्रणा बाबत परिसंवाद व चर्चा सत्र संपन्न झाले. अध्यक्षपदी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण होते.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाल्यामुळे ऊस उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कारखाना संचालक मंडळाने कारखाना कार्यक्षेत्राच्या प्रत्येक गटात ऊस मेळावे व चर्चा सत्र घेण्याचे वार्षिक नियोजन केले आहे. त्यानुसार वडगाव बक्तरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आडसाली ऊस पिक व कीड नियंत्रणा बाबत परिसंवाद व चर्चा सत्रात वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे ऊस उत्पादन व संरक्षक विभागाचे प्रमुख संशोधक डॉ.अशोक कडलग व रोग शास्त्र विभागाचे प्रमुख संशोधक डॉ.गणेश कोटगिरे यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ.अशोक कडलग यांनी ऊस पिकाच्या पाणी व खत व्यवस्थापनाबद्दल माहिती देतांना सांगितले की, ऊस पिकाची लागवड करतांना शेतकऱ्यांनी योग्य जमिनीची निवड करून सेंद्रिय कर्ब वाढवावे.खतांचा संतुलित वापर करावा.क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करून पाण्याचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घ्यावे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय चे देखील मार्गदर्शन घ्यावे असा सल्ला दिला.

ऊस पिकाच्या रोग नियंत्रणा बाबत मार्गदर्शन करतांना डॉ.गणेश कोटगिरे यांनी सांगितले की,पावसाळा सुरु झाला असून भविष्यात ऊस पिकावर ह्युमनी किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी संध्याकाळच्या वेळी ह्युमनीचे भुंगे जमा करून नष्ट करावे जेणेकरून ऊस पिकावर होणाऱ्या ह्युमनी किडीचा प्रादुर्भाव रोखणे सहज शक्य होते. तसेच विविध किडीचे व रोगांचे एकात्मिक नियत्रण करण्यासाठी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे म्हणाले की, चालू वर्षी मे महिन्यापासूनच वरून राजाने कृपा केली असून कारखाना कार्यक्षेत्रात देखील चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आडसाली ऊसाचे उत्पन्न घ्यावे. आडसाली ऊसाच्या लागवडीतून एकरी ६० ते ७० टन उत्पन्न मिळते व आडसाली ऊस कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होताच तोडला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आडसाली ऊसाच्या लागवडी कराव्या असे आवाहन केले.  

          या ऊस पिक परिसंवादासाठी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक श्रीराम राजेभोसले, सचिन चांदगुडे, सुनील मांजरे, माजी संचालक कचरू घुमरे, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन आण्णासाहेब चीने यांनी केले तर आभार शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने सभासद व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. ऊस पिक परिसंवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास व शेतकी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!