राहाता पंचायत समितीला विभागस्तरावर "उत्कृष्ट पंचायत समिती" पुरस्कार प्रदान
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सण २०२३-२४ मध्ये प्रशासकीय कार्यप्रणाली, विकासकामांची अंमलबजावणी आणि लोकाभिमुख उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राहाता पंचायत समितीला नुकताच मुंबई येथील यशवंतराव सभागृह येथे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे विभागस्तरावरील “उत्कृष्ट पंचायत समिती” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
हा सन्मान गटविकास अधिकारी पंडित वाघेरे यांनी राज्याचे महाहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, ग्रामविकास व पंचायत राजविभाग मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास व पंचायत राजविभाग राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
राहाता पंचायत समितीने गतवर्षभरात प्रशासकीय पारदर्शकता, लोकाभिमुखता व उत्तरदायित्व या तत्त्वांवर आधारित कार्यपद्धती राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. पंचायत समितीने उत्कृष्ट कामगिरी, तसेच आयएसओ प्रमाणपत्र, राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी साधली आहे. विशेषतः, कुपोषणमुक्त तालुका, बालकांचे पोषण व सर्वांगीण विकास, गुणात्मक शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (जसे की दृश्य-श्राव्य साधने), अशा क्षेत्रांमध्ये भरीव कार्य झाले आहे. उमेद योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात आले आहे. कृषिपूरक व लघुउद्योगांना चालना देण्यासाठी मूल्यवर्धन, विपणन व प्रोत्साहन या धोरणांवर भर देण्यात आला आहे. यामुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यात यश आले आहे.
तसेच पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयात स्वागत कक्ष,हिरकणी कक्ष, अग्निशमन यंत्रणा, फेशियल रेकग्निशन यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच सेंद्रिय कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे कामकाज अधिक प्रभावी आणि पारदर्शक झाले आहे.
हा पुरस्कार मिळणेकामी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, राहाता पंचायत समितीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याची पावती असून, भविष्यातही अशीच लोककल्याणकारी कामगिरी करण्याचा निर्धार असणार आहे.
- पंडित वाघेरे,
गटविकास अधिकारी पं. समिती, राहाता.
"





