ठेकेदाराच्या घरासमोर खडी टाकुन आंदोलन करणार
खडडा हुकवा बक्षिस मिळवा प्रवास करणा-यांची अभिनव योजना
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील धामोरी ते टाकळी या रस्त्यावरील झेड कॉर्नर ते गाडे वस्ती रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असुन भले मोठे खडडे पडल्यांने खड्डा हुकवा अन बक्षीस मिळवा अशी अभिनव योजना या रस्त्यावरून प्रवास करणा-यांनी आखली आहे. गेल्या चार महिन्यापासून रस्ता कामासाठी खडी टाकण्यांत आली पण अद्यापही कामाला मुहूर्त लागला नाही, पावसाळा तोंडावर येवुन ठेपला असुन या रस्त्याचे काम कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
कोपरगांव तालुक्यात रस्त्याची वाताहात झाली आहे, जे चांगले रस्ते आहे त्यावरून प्रवास करतांना अनंत अडचणींना पादचाऱ्यांसह वाहनकर्त्यांना सामोरे जावे लागत आहे., कामाची गुणवत्ता ढासाळली आहे. ज्यांची अवस्था वाईट आहे त्या रस्त्याबददल न बोललेलेच बरे.
दळणवळणाच्या दृष्टीने व अहिल्यानगर नाशिक या दोन जिल्हयांना जोडणा-या रस्त्यामध्ये धामोरी टाकळी रस्त्याचा समावेश होतो, मात्र त्यातील झेड कॉर्नर ते गाडे वस्ती या रस्त्याला गुडघ्याच्यावर खडडे पडलेले आहे. त्यातुन वाहन चालवितांना अनेकांना कसरत करावी लागते. शाळा कालावधीत मुलांना दैनंदिन प्रवास करतांना गुडघे, डोके फुटणे, हाता पायाची ढोपरे फुटणे हे नित्याचेच झाले आहे. रात्री अपरात्री आजारी रूग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठांना रूग्णालयात घेवुन जाणे म्हणजे दिव्य काम वाटते. या रस्त्यांने पादचा-यांना व्यवस्थीत चालता येत नाही तेथे वाहन चालविणे म्हणजे अवघड काम होवुन बसले आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम खात्याचे उंबरे झिजवले पण त्यांनी या रस्त्याच्या कामाला अजुनही मुहूर्त लावला नाही, वास्तविक पाहता चार महिन्यापासुन खडी येवुन पडली तेंव्हाच याचे काम व्हायला पाहिजे होते पण सध्या अवकाळी पाऊस होत आहे, त्यात रस्त्याचे काम केले तर त्याची गुणवत्ता राहणार नाही, तेंव्हा संबंधीत ठेकेदारांना या रस्त्याच्या कामाची आठवण द्यावी अन्यथा या रस्त्यावरून प्रवास करणारे पादचारी, वाहनचालकच ही खडी थेट सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदाराच्या घरासमोर टाकुन प्रतिकात्मक आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.






