भगवंतांच्या न्यायालयातच मनुष्याच्या दुष्कृत्याची सोडवणुक -साध्वी अनुराधादिदी
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
भगवंतांच्या न्यायालयातच मनुष्याच्या दृष्कृत्याची सोडवणुक होते, दुराचा-यांना सुधारण्याची संधी मिळते असे प्रतिपादन साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर यांनी केले.
येथील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर मुंबादेवी तरूण मंडळ साईगांव पालखीच्यावतीने श्री शिवमहापुराण कथा सोहळयाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे दुसरे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, मनुष्यांने नेहमी चांगली संगत धरावी, जीवनांत आसक्ती ठेवु नये, कितीही प्रेम असले तरी एकमेकांच्या ताटात जेवु नये. सदाचाराने मनाचा मार्ग मोकळा होतो. प्रसाद चवींने नव्हे तर बुध्दीने ग्रहण करावा. संतांचे सामर्थ्य मोठे आहे त्यांचा नेहमी आदर करावा. जो भगवंताला शरण जातो त्याच्या पापाचे नेहमीच हरण होते. मनुष्याच्या स्वभावातील दुर्गुण दुर करण्यासाठी शिवमहापुराण कथा श्रवण चांगले आहे. समुद्रस्नानाने तीर्थाचे पुण्य लाभते. दैनंदिन आचरणावर मनुष्याचे जीवनात शुभ अशुभ घटना ठरत असतात. २८ प्रकारचे नरक असुन एका नरकात ८६ प्रकारचे कुंड असतात, पाप मोठे असेल तर नरकाचा प्रवासही वाढलेला असतो. आई वडीलांचा पदोपदी अपमान करू नये, भगवंत कथेची कधीही निंदा करू नका, जे सन्मार्गावर चालतात त्यांना शिव्या शाप देवु नका. ईश्वर कधीही म्हातारा होत नाही, सर्वात श्रेष्ठ महादेव आहे. कथा सांगणा-यापेक्षा श्रवणकर्त्यांचे आसन कधीच मोठे असु नये. वाद म्हणजे भांडण, विवादातुन चर्चा घडते तर संवादातुन तत्व जाणता येते तेंव्हा प्रत्येकांने काय घ्यायचे हे ठरवावे. कलीयुगात ग्रंथ हेच मानवाच्या कल्याणाचे गुरू आहेत. धर्मशास्त्रावर अविशवास दाखविल्याने अडचणींचा सामना अधिक करावा लागतो. जन्मविच्छेद आणि पापनाश यालाच जप म्हणतात. सेवा कशी करावी, साधक कुणांला म्हणांवे, श्रवण-मनन-किर्तन काय आहे, दैनंदिन पुजा कशी करावी, परमात्मा म्हणजे काय, महाशिवरात्रीचे महत्व आदि बाबत मनुष्याचे असलेले अज्ञान शिवमहापुराणातुन दुर होते तेंव्हा कितीही अडचण आली तरी शिवमहापुराण सर्वांनी श्रवण करावे. मनुष्य बारा ज्योर्तीलिंगाच्या यात्रा करतात पण त्याचबबरोबर तामिळनाडुजवळ अरूणाचलम येथे सर्वप्रथम दिव्य ज्योतिर्लिंग अवतरलेले आहे त्या चौदा किलोमिटर पर्वताला प्रदक्षिणा घालावी त्यातुन कैलास पर्वताच्या प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. याठिकाणी विदेशातील असंख्य भाविक ध्यान धारणेसह शिवमहापुराण अभ्यासासाठी येतात. मनुष्य कलीयुगात व्यक्त केलेल्या वाणीला कधीच जागत नाही, आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे असे त्या म्हणाल्या.
चौकट-
जगात श्रीशिवमहापुराण कथा लोकप्रिय करण्यांत पंडीत प्रदीप मिश्रा यांचा सिंहाचा वाटा असून अनेकावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याने अनुराधा दीदींच्या शिवमहापुराण कथा श्रवणासाठी महिलांची अलोट गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कथेत महिलासह पुरूष भाविकही फेर धरून नाचण्याचा, फुगडीचा, टाळयांचा आनंद घेतात. महिला घरूनच निरंजन सजवुन आणतात त्यामुळे आरतीच्यावेळी नयनमनोहर दृष्य दिसते. ब्रम्हा, विष्णु महेश सजविलेल्या झाकीने भाविकांना साक्षात परमेश्वरी अनुभुतीचा आनंद प्राप्त होतो. लहान मुलेही टाळ्या वाजवुन कथेचा आनंद घेतात. संस्कृती दालनाच्यावतीने भाग्यवान महिला भाविकास पैठणी देण्यांत येते. वैद्यकिय क्षेत्रात काम करणा-या विभुतींच्या हस्ते दुस-या पुष्पाची आरती झाली.




