राष्ट्रसेविका भाग्यश्री भिमराव बडदे नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित.
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, नाशिक वतीने विशेष सोहळ्याचे आयोजन.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय नाशिक यांचे वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त संस्कार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत राहिलेल्या राष्ट्रसेविका भाग्यश्री भिमराव बडदे यांना कोपरगांव येथे राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सरला दिदी यांचे हस्ते नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोपरगांव येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रावर विशेष समारंभात कोपरगांव तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत महिलांना ब्रम्हाकुमारीज् नारी शक्ती सन्मानाने गौरवण्यात आले.
या कार्यक्रमात देर्डे चांदवड च्या सरपंच सौ. प्रतिभा कैलास गायकवाड , उपसरपंच शकुंतला बाळासाहेब कोल्हे, देर्डे को-हाळे येथील पोलीस पाटील विद्या रमेश डुबे , माजी नगराध्यक्षा सुहासिनी ओमप्रकाश कोयटे, एकल महिला समितीच्या संगिता अरविंद मालकर, समाजसेविका सुनयना प्रभाकर केळकर यांनाही पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरकारी अभियोक्ता अशोकराव टुपके, राजयोग अध्यात्मिक ध्यान केंद्राचे साधक, साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाॅल,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन्मानपत्रावर महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख असून त्यावर राजयोगिनी ब्रम्हाकुमारी वासंती दीदीजी यांची यांची स्वाक्षरी आहे. साप्ताहिक नाशिक परिसरचे या उपक्रमास सहकार्य लाभले आहे.
श्रीम. भाग्यश्री बडदे ह्या लोकनेते माजी खासदार स्व. भिमराव (नाना) बडदे यांच्या पत्नी असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका कार्यात त्या सदैव समर्पित भावनेने सहभागी असतात.
कोपरगांव तालुक्यातील मळेगावथडी येथील विष्णु बडदे यांच्या वस्तीवर बडदे कुटुंबातील थोरले कृष्णराव यांच्या कडे जनमाणसांचा मोठा गोतावळा असायचा. थोडक्यात सांगायचे तर शे-दोनशे लोकांची रोजची पंगत असायची. संपुर्ण बडदे परिवार कोपरगांव तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उभारणीत तन-मन-धनाने उभे राहिलेलं. काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धडाडीचे असंख्य स्वयंसेवक यांना मिसा कायद्याने बंदी बनवले. अशा प्रसंगी बडदे परिवारातील कृष्णराव,शंकरराव,भिमराव,उत् तमराव यांना सूडबुद्धीने १९ महिने जेलमध्ये डांबले. कर्ता म्हणून एकही पुरुष बडदे परिवारात राज्यकर्त्यांनी घरात ठेवला नाही. एवढ्या टोकाची आणि सुडाची महाराष्ट्रातील ही बडदे परिवाराची एकमेव घटना होती. अशा कठीण प्रसंगी बडदे परिवारातील महिलांनी रणरागिणी होवून कुटुंबासह समाजात धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या. स्वत: शेती सांभाळून मुलांचा सांभाळ केला.
एवढे योगदान असूनही कुठल्याही प्रकारची मानसन्मानची अभिलाषा न बाळगता बडदे परिवार जनमानसातील महत्वाचे स्थान टिकून आहे.
याच परिवारातील भाग्यश्री बडदे सामाजिक बाधिलकीतून महिलांच्या विविध कार्यक्रमात त्यांचा नि:स्वार्थ सहभाग असतो. राष्ट्रसेविका म्हणून त्यांचे समर्पित कार्य आहे.आप्तस्वकियांसह जनसामान्यांना त्या 'नानी' नावाने परिचित आहे.त्यांना मिळालेल्या नारी शक्ती सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








