तीर्थक्षेत्र कचेश्वर देवस्थान-कोकमठाण रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करा-क्षीरसागर
कोपरगांव-( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील कोपरगांव बेट भागातील प्रति त्रंबकेश्वर समजल्या जाणा-या कचेश्वर देवस्थानात महाशिवरात्र पर्वानिमीत्त सालाबादप्रमाणे याही वर्षी साफ सफाई अभियान सुरू असुन तीर्थक्षेत्र कचेश्वर देवस्थान कोकमठाण रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करावे म्हणजे भाविकांना त्याचा त्रास होणार नाही अशी मागणी कचेश्वर देवस्थानचे पुजारी व अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे सचिव रमेश उर्फ काशिनाथ भाउराव क्षीरसागर (गुरव) यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगांव व तहसिल कार्यालय येथे रमेश क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे, सध्या एमडीआर ९९ नगर मनमाड राज्य मार्ग कोपरगांव बेट ते कोकमठाण या रस्त्याचे खडी मुरूम टाकुन रूंदीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र असुन कचेश्वरी तसेच कोकमठाण येथील हेमाडपंथी महादेव मंदिर येथे मोठया प्रमाणांत भाविकांची गर्दी होत असते.
कोकमठाण महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांना रस्त्याचा वापर करावा लागतो, त्यांची गैरसोय होवु नये, सुलभरित्या दर्शन व्हावे यासाठी सदर रस्त्याचे काम जलदगर्तीने पुर्ण केले जावे, कचेश्वरी असलेल्या पेशवेकालीन पाय-याजवळ महाशिवरात्र काळात पुजा साहित्य दुकानासह पार्कीग व्यवस्था केली जाते मात्र सदर ठिकाणी मातीचा भराव आहे तो सुरळीत करण्यांत यावा असे ते शेवटी म्हणांले.








