कोपरगांव ः लक्ष्मण वावरे दि.९ डिसेंबर २०२४
आगामी वर्षात जेष्ठमधी पाऊस पडलं.....मध्य ज्येष्ठाला गाई चाऱ्याला लागतील..... आद्रा नक्षत्रात पेरण्या होतील.....आखाडी म्हणजे तीन हप्ते पाऊस पडणार नाही.....चारा पाणी कमी जास्त प्रमाणात होईल..... ढवळ्या धान्याला महागाई होईल...... पिवळे धान्य जसे हरभरा कमी प्रमाणात होईल.... हिरवे वस्त्र परिधान करू नये.... पौष महिन्यात काही ठिकाणी गारपीट होईल..... मनुष्याला पिडा राहील.... अशा आशयाचे व्हईक बिरोबा महाराजांचे भगत रामदास मंचरे (भोजडे) यांनी वर्तवले.
शहरातील गावठाण भागात असलेल्या सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वीच्या जागृत देवस्थान मंदिरात श्री वीरभद्र उर्फ बिरोबा महाराजांची यात्रा पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
यावेळी दहेगाव, धोत्रे, गोधेगाव, तळेगाव, वाहेगाव, लोकी येथील कर्णमहाल देवांच्या काठ्या भेटीसाठी आल्या होत्या. या काठ्यांना निशान,झालंर, मोरपिसे, फुलांच्या माळांनी सजवले होते. पारंपारिक पद्धती नुसार बिरोबा महाराजांना गंगास्नान, महा मस्तकाभिषेक, फुलांची सजावट करण्यात आली. महाआरतीस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्णमहाल देवांच्या काठयांची भेट हनुमान मंदिराजवळ झाली. सुवासिनींनी देवाच्या काठ्या घेऊन आलेल्या भक्तांच औक्षण केले, त्यानंतर शहरातून श्री वीरभद्र उर्फ बिरोबा महाराजांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची अतिषबाजी सह फुलांची उधळण करण्यात आली, भगत मंडळींनी देवा समोर कौल लावला, त्यात वरील प्रमाणे व्हईक वर्तवण्यात आले. पारंपारिक धनगरी ओव्या, डफ वादन, नृत्य सादर करण्यात आले, त्यानंतर उपस्थित शेकडो भाविकांना मसालेभात व बुंदीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. बिरोबा यात्रा यशस्वी करण्यासाठी विठ्ठल मैंदड, कांतीलाल मैंदड, दीपक मैंदड, राजेंद्र मैंदड, दत्तात्रय मैंदड, संतोष मैंदड, रमेश टिक्कल यांच्यासह समाज बांधवांनी प्रयत्न केले






