banner ads

समाज उद्धारासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे कार्य अलौकिक -- रमेशगिरी महाराज.

kopargaonsamachar
0
समाज उद्धारासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे कार्य अलौकिक -- रमेशगिरी महाराज.

कोपरगाव -(लक्ष्मण वावरे ) दि. १३ डिसेंबर २०२४ 

             राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांनी समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, ३५ वर्षांपूर्वी ते ब्रम्हलीन झाले असले तरी त्यांचा अधिवास आजही समाधीस्थान मंदिरात व आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशी परिसरात आहे. त्यांच्या कृपादृष्टीने जगाचे कल्याण होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीस्थान कोपरगावबेटाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी केले., राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा श्रमदानावर विशेष भर होता. पुण्यतिथी व गुरुपौर्णिमा उत्सवाचे महत्त्व त्यांनी यावेळी विषद केले.
         राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या ३५ व्या पुण्यतिथी उत्सव व भव्य जपानुष्ठान सोहळ्याची सांगता कोपरगाव बेट भागातील समाधीस्थान मंदिरात झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाविक भक्तांना भाकरी व चाळीस हजार लिटर आमटी महाप्रसाद म्हणून वाटण्यात आला. 

 
            बाबाजींच्या समाधीची महापूजा, नित्यनियम विधी, सत्संग, प्रवचन, पादुकांच्या उत्सव मूर्तीची षडशोपचार महापूजा, सात दिवस सुरू असलेले जपानुष्ठान सोहळ्याची सांगता झाली, कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न प्रशांत शिखरे गुरुजी (त्र्यंबकेश्वर), अनंतशास्त्री लावर (राहता) यांनी केले.
          प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी केले. समाधीस्थान बेट आश्रमाच्या वतीने येथील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत मंदिर सुशोभीकरण, श्रीकाशी विश्वनाथ मंदिरातील पिंडीला तांब्याचे आवरणपत्र, तसेच बाबाजींच्या मूर्तीच्या मागे चांदीचे मखर बसवण्याचे काम मंदिर प्रशासन व विश्वस्तांनी हाती घेतले असून लवकरच ते पूर्णत्वास येणार असल्याचे ते म्हणाले. 
            भाविक भक्तांच्या सोयीसाठी भक्तनिवास, अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची सोय,सोलर सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरे,मंदिर परिसरातील रस्ते, सुशोभीकरण, कमान आदी सोयी सुविधा यांची कामे आश्रमाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बाबाजींच्या समाधीस्थान व मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, व फुलांची सजावट करण्यात आली होती.
        याप्रसंगी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गोदावरी खोरे दूध संघ यांच्या माध्यमातून कोल्हे, काळे, परजणे यांचे सह पंचक्रोशीतील भाविकांचे मोठे योगदान कायम लाभते असे रमेशगिरी महाराजांनी सांगितले.
           त्रंबकेश्वर येथील भाऊ पाटील यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेचा यावर्षीचा धार्मिक अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सर्व विश्वस्तांनी सत्कार केला. 

        संत जनार्दन स्वामी यांनी केलेल्या कार्याचे स्मरण त्यांनी केले. यावर्षी सातपूर, तपोवन, त्रंबकेश्वर, नाशिक, मालेगाव, कवठे कमळेश्वर, संगमनेर आदी ठिकाणाहून पायी दिंड्या आल्या होत्या. 
         याप्रसंगी स्वामी भोलेगिरी, गणेशगिरी, ज्ञानानंद गिरी, यांच्यासह शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्त त्र्यंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, संदीप चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे, माधवराव पाटील, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सुनील चव्हाण, मध्यप्रदेश येथील जयप्रकाश चौरसिया, दीपक भुतडा, दिनेश परिहार ,धनंजय जगताप यांच्यासह भाविक भक्त, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 [ उपस्थित भाविकांना नाशिक येथील अरुण बोडके परिवार यांच्या वतीने महाप्रसाद म्हणून ११ क्विंटल डाळीची चाळीस हजार लिटर आमटी, संगमनेर येथील अतुल चांडक यांच्या वतीने आमटी साठी लागणारा मसाला, व कोपरगाव, टापरगाव, जातेगाव, वैजापूर अहिल्यानगर, वेरूळ, अंदरसुल, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, येथून भाविकांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या भाकरीचा महाप्रसाद यावेळी वाटप करण्यात आला. मंदिर परिसरात विविध धार्मिक वस्तू विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते ]
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!