कोपरगाव नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार 'सेमी-इंग्लिश'सह रिक्त पदे भरा, अन्यथा ठिय्या आंदोलन!
कोपरगाव समाचार : कोपरगाव नगरपरिषदेच्या शिक्षण विभागातील रिक्त पदे, शाळांमधील अपुऱ्या सुविधा आणि 'सेमी-इंग्लिश' माध्यम सुरू करण्यास होणारा विलंब यावरून 'माझा गाव माझा अभिमान कोपरगावकर' संघटना आक्रमक झाली असून, मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, शिक्षण विभागातील 'प्रशासन अधिकारी' हे महत्त्वाचे पद अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या पदावर सक्षम अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी.तसेच, नगरपरिषद शाळा खाजगी शाळांशी स्पर्धा करू शकतील यासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून 'सेमी-इंग्लिश' माध्यम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून द्यावीत आणि प्रत्येक नगरपरिषद शाळेची पटसंख्या किमान १०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.या निवेदनाच्या प्रती शालेय शिक्षणमंत्री, पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनावर विनय भगत, मयूर आव्हाड, विजय जाधव आणि अमित आढाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







