मनेगावच्या मातीतून घडलेली जिद्दीची यशोगाथा
अनिल गांगवे पी.एस.आय. पदावर विराजमान
कोपरगाव समाचार : छोट्या खेड्यातील साध्या वातावरणात रुजलेली स्वप्ने, जिद्द आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर उंच भरारी घेता येते, याचा प्रत्यय मनेगावच्या सुपुत्र अनिल हिरालाल गांगवे यांच्या यशातून पुन्हा एकदा आला आहे.
मनेगाव येथे १ ली ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी मोठी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली. पुढे रांजणगाव येथे ५ वी ते १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण घेत असताना मेहनत, शिस्त आणि चिकाटी यांचा मजबूत पाया त्यांनी रचला. शिक्षणातील सातत्य कायम ठेवत त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज, कोपरगाव येथे उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि ध्येयवेडेपणाची भर पडली.
सन २०१७ साली नाशिक येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती होताच त्यांच्या सेवाभावाच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर त्यांनी आपल्या कामात वेगळी ओळख निर्माण केली.
याच जिद्दीच्या जोरावर त्यांनी एमपीएससीच्या विभागीय परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) पदावर झेप घेतली. त्यांच्या या यशामुळे मनेगावसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनिल गांगवे यांची ही प्रेरणादायी वाटचाल आजच्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरत आहे. “मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही,” हा संदेश त्यांच्या यशातून स्पष्टपणे दिसून येतो.




