चांदे कसारे येथे 'विराट हिंदू संमेलनात' भारुडकार भानुदास बैरागी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
गल्ली ते दिल्ली’ प्रवासाचा गौरव —
कोपरगाव समाचार :- कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाच्या भव्य व्यासपीठावर सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला. सुप्रसिद्ध भारुडकार भानुदास बैरागी यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'भारुड कलेचा गल्ली ते दिल्ली प्रवास' या विशेष पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवर साधु-संतांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
या सोहळ्याला अध्यात्मिक क्षेत्रातील मोठी मांदियाळी उपस्थित होती. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज मठाचे महाधिपती प.पु. रमेशगिरी महाराज, ओम गुरुदेव आत्मा मलिक ध्यानपीठ कोकमठाणचे परमानंदगिरी महाराज, आणि राधेश्वर मंदिर कुंभारीचे राधेश्वरनंदगिरी महाराज यांच्या पावन उपस्थितीत हे पुस्तक विमोचन पार पडले. यावेळी व्यासपीठावर मनसुख महाराज दहे, वैष्णव महाराज जाधव, उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा कार्यवाह प्रा. दीपक गुलाबराव जोंधळे , सोनेवाडीच्या कविता साबळे, कल्याण होन, शांतिलाल होन, ॲड. मोकळ, प्रथमेश मिंगळे तसेच रमेश्वर बैरागी आणि ओम बैरागी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारुड या लोककलेला ग्रामीण भागातील गल्लीपासून ते देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपर्यंत पोहोचवताना आलेले अनुभव, संघर्ष आणि कलेची व्याप्ती भानुदास बैरागी यांनी या पुस्तकात प्रभावीपणे मांडली आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी चांदे कसारे मंडळातील चौदा गावांतील ग्रामस्थ, नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संतांच्या हस्ते आणि जनसमुदायाच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्यामुळे भारुड कलेचा सन्मान झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भानुदास बैरागी यांच्या साहित्यिक प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




