“ऑनलाइन बैठका, ई-बाईक आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; संजीवनीचा नवा आदर्श”
कोपरगाव समाचार:-इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिक, उद्योग व संस्थांना ऑनलाइन बैठका घेऊन इंधन बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले असताना, त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत संजीवनी उद्योग समूहाने देशात आदर्शवत पाऊल उचलले आहे. आपल्या कामकाज बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय राबवणारा संजीवनी उद्योग समूह हा देशातील पहिला सहकारी उद्योग समूह ठरला आहे.या बैठकीत जागतिक पातळीवर युद्धजन्य स्थितीत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे व देशात इंधन बचत केल्यास परकीय चलन वाचवता येईल या बाबीवर संजीवनी उद्योग समूहाने गांभीर्याने निर्णय घेतले आहे.
उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच कोल्हे कारखाना अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेत कारखाना ओरशियर आणि फिल्डमॅन यांच्यासाठी इलेक्ट्रिक बाईक आणि दैनंदिन वापराचे सर्व भाडोत्री वाहने ही सी एन जी व इलेक्ट्रिक असणारीच वापरावी असा निर्णय घेण्यात आला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत इंधन बचत, वेळेची बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला आहे. ग्रामीण सहकार क्षेत्रातही डिजिटल परिवर्तन शक्य असून त्यातून राष्ट्रीय हित साधता येते, हे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.
तातडीनं या निर्णयाची अंमलबजावणी करत संजीवनी कार्यस्थळावर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरासाठी दाखल करण्यात आला आहे त्याची औपचारिक सुरुवात केली आहे.सहकार महर्षी कोल्हे कारखाना हा नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी देशभरात ओळखला जातो.
दूरदृष्टी प्रणालीद्वारे संजीवनी उद्योग समूहाने घेतलेली ही बैठक चर्चेचा विषय ठरत असून इतर देखील उद्योग समूह आणि व्यावसायिकांनी या उपक्रमाचा आदर्श घेत इंधन बचत इकडे पाऊल टाकण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. या बैठकीत अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, चेअरमन आ. विवेक कोल्हे, व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, सर्व संचालक, अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. त्यानंतर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कारखाना कार्यस्थळावर सुरू करण्यात आला त्यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, नगराध्यक्ष पराग संधान, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सेक्रेटरी टी.आर.कानवडे,प्रकाश डुंबरे,अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






