डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र, समता आणि न्यायाची जडणघडण करणारं व्यक्तीमत्व-वाघ
कोपरगांव समाचार:- घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र, समता आणि न्यायाची जडणघडण करणारं व्यक्तीमत्व होतं असे प्रतिपादन राष्ट्रसंत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय (तिळवणी) चे संस्थापक अध्यक्ष विष्णु वाघ यांनी केले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा पाया आपल्या अहिल्यानगर जिल्हयातुन घातला आहे असेही ते म्हणाले.
तालुक्यातील तिळवणी वाचनालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी ते अभिवादन करतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब गायके होते.
प्रारंभी मुख्याध्यापक श्री. टोरपे यांनी प्रास्तविकात घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबददल संपुर्ण माहिती देत या महामानवाच्या जयंतीमुळे त्यांच्या कार्याला उजाळा मिळतो असे सांगितले. श्री. गुंजाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
विष्णु वाघ पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घ्या, जबाबदार नागरिक बना आणि संघटीत व्हा हा नारा दिला. आपल्या देशातील लोकशाही समृध्द करण्यांत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला महत्व देत अनेक पिढया घडविण्यांचे काम केले. नानासाहेब गायके अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत संघर्ष करत भारतीय संविधानाची निर्मीती केली. त्यांचे प्रत्येक क्षेत्रात अलौकीक काम असल्याचे ते म्हणाले. उपस्थित विद्यार्थ्यांना खाउचे वाटप करण्यांत आले.





