लाईटचा लपंडाव थांबवा कोपरगाव ग्रामीण भागात महावितरणविरोधात संताप उसळला
कोपरगाव समाचार:-कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या वीज पुरवठ्याचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवस-रात्र सुरू असलेला ‘लाईटचा लपंडाव’ आता असह्य झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीच वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. उकाड्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांच्याही अभ्यासावर याचा गंभीर परिणाम होत आहे. परीक्षांचा काळ चालू असताना रात्रीच्या वेळी वीज नसल्याने अभ्यासात अडथळे निर्माण होत असून पालकांमध्येही चिंता वाढली आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा महावितरण प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. “वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशारा खिर्डी गणेश ,नाटेगाव, येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
ग्रामीण भागातील या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रात्री खंडित होणारा वीज पुरवठा नियमित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. सुरळीत न झाल्यास या प्रश्नावर तीव्र आंदोलन करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.




