कोपरगावात रस्ते कामांतील निकृष्ट दर्जावरून खळबळ; चौकशीची मागणी
कोपरगाव समाचार --: कोपरगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध रस्ते कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ही बाब उघड केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उपअभियंता व संबंधित ठेकेदार यांच्या संगनमतातून रस्ते कामांची बिले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यास कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, गुणवत्ता निकषांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसून येते.
निवेदनात नमूद केल्यानुसार, रस्ते बांधकामात डांबर (Bitumen) कमी प्रमाणात वापरणे, खडी (Aggregate) योग्य प्रकारे न टाकणे, रस्त्यांचा थर (Layer) पातळ ठेवणे, तसेच ठिकठिकाणी खड्डे व भेगा पडणे असे प्रकार आढळून आले आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा थर उखडून खडी बाहेर येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच काम मंजूर अंदाजपत्रकानुसार न करता जाडी (Thickness) कमी ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यासोबतच, योग्य कॉम्पॅक्शन न केल्यामुळे रस्ते काही दिवसांतच खराब झाल्याचे सांगण्यात आले आहे. पाण्याचा निचरा (Drainage) व्यवस्थाही अपुरी असल्याने रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले आहे.
या सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच गुणवत्तेचा (Quality Audit) अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळल्यास बिलांची वसुली करून शासनाची झालेली आर्थिक हानी भरून काढावी, असेही निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे कोपरगाव तालुक्यातील रस्ते कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






