बोलकी शाळेचे तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांत यश
कोपरगाव समाचार : -- पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आयोजित विविध गुणदर्शन व सांस्कृतिक तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोलकी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
वैयक्तिक गीत गायन (लहान गट) या स्पर्धेत कु. श्रावणी बाबासाहेब शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवला. समूहगीत गायन (लहान गट) – शालेय पोषण आहार गीत या स्पर्धेत शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच रिंग डान्स (लहान गट) या सांस्कृतिक स्पर्धेत शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला.
केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये प्रद्युम शिंदे याने वेशभूषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु. समीक्षा वाघ हिने वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु. ईश्वरी महेंद्र महाले हिने वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु. अन्वी महाले हिने वेशभूषा स्पर्धेत उत्तेजनार्थ, तर कु. स्वरा महाले हिने वकृत्व स्पर्धेत केंद्र स्तरावर सहभाग नोंदवला.
या यशाबद्दल गटशिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख, विस्तार अधिकारी श्रीमती अंबिलवादे तसेच येसगाव केंद्रप्रमुख संजय महानुभाव यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांचे सर्वत्र कौतुक होत असून शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.




