डॉ.आंबेडकरांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे हीच खरी त्यांना आदरांजली -- आ.काळे
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा या तत्वानुसार शिक्षण, स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला असून सर्वांनी शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. त्यांनी मानवमूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घडविण्याचा जो ध्यास घेतला, तो आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. संविधान रचतांना त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना देशाच्या केंद्रस्थानी ठेवले. आजचा दिवस सामाजिक न्याय, समानता आणि त्यांच्या शिकवणीचा वारसा पुढे घेवून जाण्याचा दिवस आहे.आपल्याला त्यांनी दिलेल्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा असून आपण त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे हीच खरी त्यांना आदरांजली असेल असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान अर्थतज्ज्ञ, सामाजिक लोकशाहीचे प्रणेते आणि समाजातील तळागाळातील जनतेला न्यायाचा मार्ग दाखवणारे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला दिलेले संविधान हे केवळ देशाचे विधेयक नाही, तर सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि मानवी अधिकारांचे दृढ मूल्य जपणारी भक्कम पायाभरणी आहे.त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही प्रत्येक पिढीला दिशा दाखवणारा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे फायदे पोहोचणे हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे खरे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी भन्ते कश्यापजी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, समाज बांधव तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





