डॉ. आंबेडकरांचा विचार, त्याग आणि कीर्ती अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार -- स्नेहलता कोल्हे
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
ज्ञानाचे महासूर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगावात अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवानेते विवेक कोल्हे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कार्यकर्त्यांसह वंदन करून महामानवांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.
वंदनीय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जरी देहाने आज आपल्यात नसले तरी त्यांचा विचार, त्याग आणि कीर्ती पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. शिक्षणाचे महत्त्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची धडपड त्यांनी आयुष्यभर केली. सामाजिक ऐक्य, बंधुता व न्यायपूर्ण समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली शाश्वत विचारसंपदा आजही आपला मार्ग प्रकाशमान करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी दिलेली लोकशाहीची चौकट आज भारताच्या विकासाच्या प्रवासाला स्थिर आणि सबळ बनवते.
भारताचे चिरंतर स्फूर्तीस्थान म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारक्रांतीने राष्ट्र उन्नत करण्याची ताकद दिली आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक व्यक्तीने समानता, शिक्षण, मानवता आणि प्रगतिच्या दिशेने कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा-आरपीआय,मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विचारस्पंदन आणि एकात्मतेच्या संदेशातून वातावरण भावपूर्ण झाले. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा आणि समाजाला दिशा देण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी दृढ केला.





