डॉ. रामचंद्र पारनेरकर महाराजांच्या तिसाव्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न.
कोपरगाव समाचार : -
श्री क्षेत्र संवत्सर येथे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीच्या पावन दिवशी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक ऊर्जेत मंगलमुर्ती श्री गणपती, श्री गुरुदेव दत्त तसेच पूर्णवाद प्रणेते प.पू. विद्वतरत्न डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा पूर्णवाद तत्वज्ञानाचे प्रसारक व पूर्णवाद भूषण विधीज्ञ गणेशदादा पारनेरकर यांच्या हस्ते, तर कलशारोहण राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.
पूर्णवाद परंपरेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील हे तिसावे मंदिर असल्याची माहिती डॉ. गुणेश पारनेरकर यांनी दिली.
या सोहळ्यास पूर्णवाद भूषण विधीज्ञ गुणेशदादा पारनेरकर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज, श्री पारनेर गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष अॅड. गुणेशदादा पारनेरकर तसेच संवत्सर महानुभाव आश्रमाचे मठाधिपती आचार्यप्रवर राजधरबाबा महानुभाव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पूर्णवाद भूषण गुणेश महाराज पारनेरकर म्हणाले की, “दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमाजवळ, ऐतिहासिक व पौराणिक भूमीत मंदिर उभारले जाणे हे मोठे भाग्य आहे. जिथे भेदभाव संपतो तेच खरे मंदिर. घरात संस्कार जपले जातात, तर मंदिरात संस्कृती टिकवली जाते. भारतीय संस्कृती जतन करण्याची हीच खरी वेळ आहे. भौतिक सुखात प्रत्येकापुढे अडचणी निर्माण झालेल्या आहे त्याची सोडवणूक अध्यात्म मार्गातून होते.
तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज याप्रसंगी बोलताना म्हणाले की, अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने संवत्सर (कोपरगाव तालुका) ही भूमी पावन झालेली आहे. शृंगऋषींच्या कर्मभूमीत पारनेरकर महाराजांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणे हा आपला भाग्याचा दिवस आहे. कलियुगात नामस्मरण हेच मोठे पुण्य कर्म आहे तेव्हा प्रत्येकाने कितीही कष्ट पडले तरी मुखाने परमेश्वराचे नाम घ्यावे. नामातून आपल्याला अडचणी सोडवणुकीचा मार्ग सापडतो. गणेशप्रिया योगीराजा समर्था… नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा…” या मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर पवित्रतेने भारून गेला.
अध्यात्मिक संस्कार व धार्मिक विधीं ११ डिसेंबर रोजी तर १२ डिसेंबर रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या विधींसाठी वेदमूर्ती हेरंब जोशी गुरुजी व संतोष गोरे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. ग्रामस्थ पुरोहित शैलेश जोशी, वर्षा जोशी, चि. अजय जोशी, योगेश जोशी यांचे सहकार्य लाभले. यावेळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे, पुणे येथील उद्योजक विनोद अहिरे, हनुमंत कुलकर्णी, मनोज सुपेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण साबळे यांनी केले, तर आभार योगेश जोशी यांनी मानले.
समस्त ग्रामस्थ, भाविक, गुरुबंधू-भगिनी यांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडला




