संजीवनीचा प्रकल्प देशात प्रथम
संजीवनीचे तंत्रज्ञ अमेरिकेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
कोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे
डसॉल्ट सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड (अमेरिका) कंपनीने भारतात पुणे येथे आयोजीत केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आकृती इनोव्हेशन स्पर्धेत संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या नवतंत्रज्ञांनी सादर केलेल्या ‘बायोमेडीकल वेस्ट स्मार्ट डस्टबीन’ या अभिनव प्रकल्पाने देशात पहिला क्रमांक पटकावला व प्रगत बुध्दिमत्तेची चुणूक दाखविली.या स्पर्धेत देशातील एकुण ११ संघ अंतिम फेरीत पोहचले. त्यातुन संजीवनीने पहिला क्रमांक पटकाविला. संजीवनीची टीम आता फेब्रुवारी २०२६ मध्ये अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व करेल, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की डसॉल्ट सिस्टिम्स कंपनीने सर्व प्रथम संपुर्ण भारतातील सहभागी संघांच्या तीन फेऱ्यांमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादरीकरण अजमावले आणि त्यातुन ११ संघांची अंतिम फेरीसाठी निवड केली. यात संजीवनीच्या संघाचा समावेश होता. अशाच पध्दतीने या कंपनीने जगातील ३७ देशांमध्ये ही स्पर्धा घेतली.
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या अभिषेक सागर नळे, भूषण मच्छिंद्र पवार, महेश आप्पासाहेब जाधव व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या इंद्रजित संदीप वाणी यांनी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळांमध्ये त्यांचा प्रोजेक्ट तयार केला.त्यांच्या प्रोजेक्टमुळे दवाखान्यातील बायोमेडीकल वेस्ट म्हणजे दवाखान्यातील टाकावु वस्तू यांचे वर्गीकरण करून तसेच त्यांचे निर्जन्तुकिकरण करून त्याची स्वयंचलित पध्दतीने पॅकींग केली जाते. या प्रोजेक्टमध्ये त्यांनी सॉलीड वर्क हे सॉफ्टवेअर वापरले असुन या सॉफ्टवेअरचा अशा पध्दतीने पहिल्यांदाच वापर केल्याचे सहभागी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक प्रा नागोराव साहेबराव सुरनर व डॉ. संदीप रामदास थोरात सांगतात.
आता या प्रकल्पातील विद्यार्थी या प्रोजक्टचे सादरीकरण अमेरिकेतील होस्टन या ठिकाणी १ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान करणार आहे. त्यांना प्रतिस्पर्धी म्हणुन जगातील ३७ संघ असणार आहे. या सर्वांचे संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन करून जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेव अमित कोल्हे यांनी राष्ट्रीय पातळीवरील विजयी नवतंत्रज्ञांचा छोटेखानी सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, मेकॅट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख डॉ. आर. ए. कापगते व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. एम. पटारे व मार्गदर्शक उपस्थित होते
संस्थेचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून समाजासाठी आपल्या तांत्रिक प्रगल्भतेच्या जोरावर उत्तमोत्तम देण्याकडे कल असायचा. या विचारांना अनुसरून संजीवनीमध्ये सातत्याने नवनिर्मितीचा ध्यास घेतला जातो. शिक्षकांच्या मार्गददर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे आमचा आत्मविश्वास दृढ झाला आहे. आमच्या प्रकल्पाला मिळालेली दाद ही केवळ व्यक्तिगत कामगिरी नसून संपुर्ण संस्थेच्या, मार्गदर्शक शिक्षकांच्या आणि आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या पालकांच्या परिश्रमांचे फळ आहे. या स्पर्धेतुन आम्हाला नवनवीन कल्पनांची देवाणघेवाण, तांत्रिक ज्ञानाची वाढ आणि राष्ट्रीय स्तरावर आमच्या संस्थेची क्षमता सिध्द करण्याची संधी मिळाली. पुढील काळातही अशाच नापिन्यपूर्ण संकल्पनांवर काम करून आणखी मोठी यशोगाथा घडवण्याचा आमचा निर्धार आहे.-
अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी.





