कोपरगावात पोलीसच करतात अवैध व्यवसायाची पाठराखण
आ.आशुतोष काळेंनी दिले मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन
कोपरगाव समाचार
-कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात वाढलेल्या अवैध धंद्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले आम सुरू आहेत. या अवैध धंद्यांना रोखण्याचे काम पोलिसांचे आहे मात्र पोलीस प्रशासनच याकडे साफ दुर्लक्ष करीत असून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. त्याचा नागरिकांना होत असलेला त्रास व नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी यापूर्वीच बुधवार (दि.०३) रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून कोपरगाव मतदार संघासह शहरात वाढलेल्या अवैध धंद्याबाबतची माहिती देवून त्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे लेखी निवेदनात नमूद करून वाढलेल्या अवैध धंद्याला आळा बसावा याबाबत सविस्तर निवेदन दिले होते.
सोमवार (दि.०८) पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून आ.आशुतोष काळे या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला गेले आहेत. त्याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांनी पुन्हा एकदा कोपरगाव मतदार संघाच्या अवैध व्यवसायाला आळा बसावा यासाठी लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवदेनात पोलीस प्रशासन अवैध व्यवसायाकडे डोळेझाक करीत अवैध व्यवसायाची पाठराखण करीत आहे. मतदार संघासह कोपरगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख देखील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्मान होवून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यावर तातडीने प्रतिबंध लावावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या लेखी निवेदनात केली आहे.त्याबाबत लवकरच कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे
अन्यथा तीव्र आंदोलन करणार--
:- कोपरगाव शहरासह संपूर्ण मतदार संघातील वाढत्या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाचे पाठबळ मिळत आहे त्यामुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही यापूर्वीच याबाबत निवेदन दिले आहे व आज (दि.०८) रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांनाही लेखी निवेदन दिले आहे. त्यांनीही कारवाई करणार असल्याचे सांगितले असून मतदार संघासह कोपरगाव शहराच्या वाढत्या अवैध धंद्यांना आळा बसेल असा विश्वास वाटतो. परंतु जर हे अवैध धंदे थांबले नाही तर मी स्वत: अवैध धंद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील.-आ.आशुतोष काळे.




