येसगाव येथे गणित–विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
कोपरगाव समाचार:-
तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे शालेय स्तरावरील गणित व विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुरेश बोळीज यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. बोळीज म्हणाले की,“गणित आणि विज्ञान या विषयांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची वृत्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी नवीन प्रयोग, सादरीकरणे आणि मॉडेल्सद्वारे आपली क्षमता सिद्ध केली आहे ही अभिमानाची बाब आहे.कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंबरे , विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती नंदा बढे , तसेच गणित विभाग प्रमुख योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यालयातील सर्व गणित व विज्ञान विषय शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण मॉडेल्स, चार्ट, प्रयोग, सोलर प्रोजेक्ट्स, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, गणितीय संकल्पनांची दृश्यात्मक मांडणी, डिजिटल प्रेझेंटेशन्स आदी माध्यमातून आपले कौशल्य सादर केले. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांना उपस्थित शिक्षक व पाहुण्यांनी विशेष दाद दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. विविध गटांमध्ये विभागलेल्या विद्यार्थ्यांनी आपली मॉडेल्स उत्तम प्रकारे मांडून परीक्षकांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनात आणि गणितीय चिंतनशक्तीत निश्चितच भर पडल्याचे शिक्षकांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आयोजन विद्यालयाने केले.सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रामदास गायकवाड यांनी केले.शेवटी पर्यवेक्षिका जयश्री आंबरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.




