कोल्हेंकडून पुन्हा एकदा राजकीय फसवणूक-उपसभापती गोवर्धन परजणे
कोपरगाव समाचार :– कोपरगाव नगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा द्यायचा का नाही? ते मी ठरवणार. तुम्ही जर नगरपालिका निवडणुकीत विरोधात काम केल्यास पाच वर्ष सत्ता माझीच राहील असा ईशारा देवून व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षपणे दमबाजी करून धमकावल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे विद्यमान उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे २०२३ ची कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत काळे गटाला मधुकर टेके यांच्या रूपाने प्रथम अडीच वर्ष सभापतीपदाची संधी देण्यात आली होती.दिलेल्या शब्दाप्रमाणे कोल्हे गटाच्या सभापतीला अडीच वर्षाचा पूर्ण कार्यकाळ सभापतीपदाची जबाबदारी पार पाडता यावी यासाठी अडीच वर्ष पूर्ण होण्याच्या एक महिना अगोदरच आ.आशुतोष काळे यांच्या आदेशाने सभापती मधुकर टेके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याप्रमाणेच २०२३ च्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्याच्या सर्वपक्षीय नेत्यांनी ठरविल्याप्रमाणे आ.आशुतोष काळे यांनी मोठ्या मनाने कोल्हे गटाला प्रथम सभापतीपदाची संधी दिली होती.आमच्या दोघांचा सभापती-उपसभापती पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपून दोन महिने झाले आहेत. मी आ.आशुतोष काळे यांच्या आदेशानुसार माझा अडीच वर्षाचा कार्यकाल संपण्याच्या अगोदर दोन महिन्यापूर्वीच दि.१६ ऑक्टोबर रोजी एक महिना अगोदरच माझ्या उपसभापतीपदाचा राजीनामा सभापती साहेबराव रोहोम यांच्याकडे सोपविला आहे.परंतु कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांनी ठरल्याप्रमाणे नैतिक जबाबदारी ओळखून अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होवून एक महिन्याचा कालावधी होवूनही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.
कोल्हे गटाचे सभापती असलेले विद्यमान सभापती साहेबराव रोहोम यांनीही ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नसून तो राजीनामा त्यांनी का दिला नाही? त्याचा उलगडा शुक्रवार (दि.१९) रोजी ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे यांच्या संतापजनक वक्तव्यातून स्पष्ट झाला आहे. त्यामुळे कोपरगाव बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा द्यायचा का नाही? ते मी ठरवणार असल्याचे सांगत कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी बांधवांना धमकावले असल्याचे काळे गटाचे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत कोल्हे गटाचा पराभव होवून पालिकेत सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा राग व्यापाऱ्यांवर काढण्यासाठी राजकीय फसवणूक करून सभापतीपदाचा राजीनामा न देवून ते आता व्यापाऱ्यांचीपण पिळवणूक करणार की काय? अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये जोर धरू लागली असून व्यापारी बांधव मतपेटीतून आपला रोष व्यक्त करणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरु झाली आहे
.- उपसभापती गोवर्धन परजणे.




