एकाला मारले मात्र बाकीच्यांची दहशत कायम
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
कोपरगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाने ठार करण्यात यश मिळवले.असले तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दररोज दिवसा, रात्री या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने बिबट्यांची दहशत कायम असून बाकीच्या बिबट्यांनाही जेरबंद करुन तालुका बिबट्या मुक्त करावा अशी मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर आणि येसगाव येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्याचबरोबर शिंगणापूरमध्ये एका मुलाला गंभीर जखमी केले होते.तर अनेकांवर जीवघेणा हल्ला करत पशुधन, पाळीव प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात मारले असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला होता. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाने कोपरगाव तालुक्यात मोठी शोधमोहीम हाती घेतली होती.
बिबट्याला पकडण्यासाठी 100 हून अधिक वन कर्मचारी मोहीमेत सहभागी झाले होते. टाकळी, येसगाव, ब्राह्मणगाव परिसरात 15 पिंजरे लावण्यात आले होते. नाशिक आणि पुणे येथून विशेष पथके बोलावण्यात आली होती. 2 शार्प शूटर्स आणि तीन ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून शोधमोहीम सुरु होती. तर, नागपूर येथील प्रिन्सिपल चीफ कंजर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट यांनी बिबट्याला पकडण्यासाठी व गरज भासल्यास ठार करण्याची परवानगी दिली होती. यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास धारणगाव शिवारात बिबट्याची हालचाल आढळल्यानंतर वनविभागाने विशेष पथकासह कारवाई सुरू केली आणि नरभक्षक बिबट्याला अखेर ठार केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असलातरी एक मारला पण बाकीच्यांची दहशत कायम असून बिबट्याच्या दहशतीमुळे कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नाहीत, कारण कामगार शेतात जाण्यास घाबरत आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत बाकीच्या बिबट्यांनाही जेरबंद करण्यासाठी मोहीम चालूच ठेवावी अशीही मागणी होत आहे.





