बिबट्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचविण्यासाठी त्याला ठार मारण्याची परवानगी मिळावी - परजणे
कोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे
अलिकडच्या काही महिन्यांपासून मानवी वस्तीमध्ये भक्ष्यांच्या शोधार्थ बिबट्यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून पाळीव प्राण्यांसह माणसांवरील हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. अशा घटनेत अनेक पाळीव प्राणी, लहान बालके व माणसांना जीव गमवावा लागत आहे. अशा हत्त्यातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शासनाने बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. केली.
यासंदर्भात श्री परजणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, अलिकडच्या काळात सर्वत्र प्रामुख्याने शेतीच्या परिसरात बिबट्यांचा मोठा वावर वाढलेला आहे. पाळीव प्राण्यांसह माणसांवरील हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी कोपरगांवनजीक टाकळी फाट्याजवळ सायंकाळच्या सुमारास ऊसतोड करणाऱ्या गरीब कुटुंबातील एका लहान मुलीवर बिबट्याने हल्ला करुन तिला ठार केल्याची घटना घडलेली आहे. शहरानजीक असलेल्या टाकळी फाट्यानजीकच्या दाट मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला असल्याचे यावरुन निदर्शनास आले. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळनंतर घराच्या बाहेर पडण्यास लोक धजावत नाहीत. एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसल्यानंतर वनविभागास कळविल्यास तातडीने कार्यवाही होत नाही. मुळात वनविभागाकडेच दुर्बल व अपुरा कर्मचारी वर्ग व अपुरी यंत्रणा असून हिंस्त्र प्राण्यांना पकडण्यासाठीच्या साधनांची (पिंजरे वगैरे) कमतरता यामुळे वनविभाग देखील हतबल झालेला आहे. पिंजरा लावण्याची वेळेवर सोय होत नाही. परिणामी बिबटे शेतामधून बिनदिक्कतपणे फिरताना दिसतात. दिवसभर ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेले असतात. दिसेल तिथे पाळीव प्राणी व माणसांवर हल्ले करुन जखमी व ठार करतात.
अलिकडच्या काही महिन्यांत बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत वाढलेली आहे. पाळीव प्राणी व दुधाळ जनावरांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना अतिशय अवघड झालेले आहे. शाळकरी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी देखील शेतकरी घाबरत आहेत. रोज कुठे ना कुठे हल्ला झाल्याचे वृत्त ऐकायला मिळते. अनेक ठिकाणी हल्ले होऊन लोक जखमी व ठार झालेले असतानाही शासनाकडून आजवर कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उलट शासनाने तीन चार दिवसांपूर्वीच बिबटे व वाघांची गणना करण्याचे आदेश काढलेले आहेत. म्हणजे शासनाला माणसांपेक्षा बिबटे आणि तत्सम हिंस्त्र प्राणी महत्वाचे वाटतात का ? असा सवाल शेतकरी वर्गांमधून विचारला जात आहे. बिबटे, वाघ व तत्सम हिंस्त्र प्राण्यांना ठार करणे हा गुन्हा असून शिक्षेची मोठी तरतूद केलेली आहे. हे खरे असले तरी हेच प्राणी आता थेट माणसांवर हल्ले करुन ठार करीत असतील तर या घटनांचा देखील शासन पातळीवर विचार होणे गरजेचे आहे. म्हणून याबाबत शासनाने गांभिर्याने विचार करून लोकांना स्वसंरक्षणार्थ बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी व तसा कायदा देखील तातडीने करावा अशीही मागणी श्री परजणे यांनी केली.






