banner ads

चला दुकानदार होऊयाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत

kopargaonsamachar
0

चला दुकानदार होऊ याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत 

परिवर्तन प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम 
कोपरगाव -- लक्ष्मण वावरे 
परिवर्तन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी दीपावलीच्या निमित्ताने चला दुकानदार होऊया हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो. या उपक्रमामध्ये नगर शहरातील विविध शाळांमधील ई. ५ वी ते ९ वीचे विद्यार्थी सहभागी होतात. यावर्षी १९ ऑक्टोबर, रविवार रोजी हा उपक्रम घेतला गेला, यामध्ये १२० विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

विदयार्थ्यांचे शालेय वयामध्येच व्यवहार ज्ञान पक्के व्हावे, वस्तू विक्री कौशल्य, संवाद कौशल्य आत्मसात व्हावे असा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे संस्थेचे सचिव वैद्य श्री अनिकेत घोटणकर यांनी सांगितले.
यावर्षीच्या चला दुकानदार होऊया चे वैशिष्ट्य म्हणजे उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना  संस्थेच्या वतीने स्वकमाईतून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आणि या आवाहनाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या स्वकमाईतून रु. २१, ००० रक्कम जमा झाली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वकमाईचा आनंद मिळतोच परंतु त्याचबरोबर कुणासाठी काही देण्याचाही आनंद मिळावा, तसेच त्यातून त्यांची समाजासाठी काही करण्याची वृत्ती निर्माण व्हावी असा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे संस्थेच्या खजिनदार सौ. मुग्धा घोटणकर यांनी सांगितले.
सदर उपक्रमाला जाहिरात तज्ज्ञ ज्ञानेश शिंदे, उद्योजक अशोक थत्ते, उद्योजक गिरीश मुळे, व्यावसायिक लक्ष्मीकांत चिकटे, तसेच विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी ई. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमात उत्तम संवाद कौशल्य, उत्तम सादरीकरण, स्वतः बनवलेल्या वस्तू विक्री तसेच दातृत्वाबद्दल विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष  रवींद्र करंदीकर उपस्थित होते.
जमा झालेला मदत निधी जनता सहकारी बँकेच्या नगर शाखेच्या सहाय्यक शाखा अधिकारी रुपाली गांगुर्डे, प्रियांका कदम तसेच इतर सहकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हा मदत निधी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा झाला असून त्यामार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचणार आहे. बाल दुकानदारांनी केलेल्या या छोट्याश्या मदतीचे सर्वत्र कौतुक होते आहे.
सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिवर्तन प्रतिष्ठानच्या सौ. प्रज्ञा असनिकर, सौ. अश्विनी भालेराव, संस्थेच्या व्यवस्थापिका सौ. मानसी देशपांडे तसेच पालवी शिशुविहार शाळेच्या सर्व शिक्षिकांनी प्रयत्न केले. बालक मंदिर महिला मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ व सहकारी शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!