महावितरणच्या कनिष्ठ सहाय्यक लेखा परीक्षेत घोळ !
परीक्षार्थींचा निकालावर आक्षेप , न्यायालयात जाण्याची तयारी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे ) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कनिष्ठ सहाय्यक लेखा परीक्षेच्या निकालामध्ये घोळ झाल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे. १५ जानेवारीला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात निवड झालेल्या परीक्षार्थींची केवळ नावे जाहीर केली आहेत परंतु त्यांना किती गुण मिळाले या संदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे निकालावर आक्षेप घेत विद्यार्थी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत
.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाने डिसेंबर २०२३ मध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती प्रारंभी ही परीक्षा फेब्रुवारीत होईल असे सांगण्यात आले होते मात्र ,दरवेळी नवे नोटिफिकेशन काढून परीक्षा पुढे ढकलण्यात आली .
आय बी पी एस च्या वतीने अखेर ऑक्टोबर २०२४ मध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली या परीक्षेचा निकाल १४ जानेवारीला संकेतस्थळावर जाहीर केला ,परंतु तासाभरातच संकेतस्थळावरून तो डिलीट करण्यात आल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे. यानंतर १५ जानेवारीला पुन्हा निकालाची यादी जाहीर करण्यात आली परंतु या यादीत ज्या परीक्षार्थींची निवड केली त्यांना मिळालेले परीक्षेतील गुण देण्यात आलेले नाही .
तसेच कोणत्याच परीक्षेत परीक्षार्थीला परीक्षेतील गुण सांगण्यात आले नाहीत त्यामुळे या परीक्षेमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी परीक्षार्थीनी केली आहे .
अभ्यासक्रमातही केला बदल --
कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी सुरुवातीला १५० गुणांच्या परीक्षेत ११० गुण हे अकाउंट या विषयावरील तर ४० गुण इतर विषयावरील प्रश्न राहणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु सप्टेंबर २०२४ मध्ये अभ्यासक्रमात बदल करून ५० गुणांसाठी अकाउंट तर १०० गुणांची इतर विषयावर प्रश्न राहणार असल्याचे सांगण्यात आले .परीक्षेच्या एक महिन्यापूर्वी हा बदल करण्यात आला .
महावितरणच्या कनिष्ठ सहाय्यक लेखा परीक्षेचा निकाल जाहीर करताना आयबीपीएस ने परीक्षार्थींना मिळालेले गुण दाखविले नाही तसेच निवड केलेल्या परीक्षार्थींचे गुणदेखील देण्यात आलेले नाही त्याचबरोबर निकालाच्या यादीवर कोणत्याही अधिकाऱ्याचे डिजीटल स्वाक्षरी नाही विद्यार्थ्यांना त्यांचे गुण दाखवण्यात यावे.