संवत्सरच्या चिंतामणी गणपती स्थानावर गणेश जयंतीचा कार्यक्रम
कोपरगांव ( लक्ष्मण .वावरे )सालाबादप्रमाणे याही वर्षी नागपुर मुंबई द्रुतगती मार्गावर असलेल्या संवत्सर येथील गणेश बंधारा लगत चिंतामणी गणपती देवस्थानावर गणेश जयंती निमीत्त १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप आकाश महाराज चव्हाण (भगुर वैजापुर) यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला आहे.
गणेश जयंती निमीत्त या स्थानावर भाविकांची मोठया प्रमाणांत गर्दी असते. अनेक भक्तांच्या इच्छा पुर्ण करणारे हे धार्मीक स्थान असुन सदर दिवशी सकाळी साडेसात वाजता अभिषेक व नउ वाजेपर्यंत सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यांत आलेली आहे.
ऐतिहासिक पौराणिक संदर्भ असलेल्या संवत्सर गावाजवळ पेशवेकालीन देखणी चिंतामणी गणपतीची मुर्ती असुन मंदिर परिसरात खास सजावट करण्यांत आली आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थी निमीत्त दुरवरून असंख्य भक्त पायी दर्शनासाठी येथे येतात.
पेशवेकाळात नानाजी विठोबा बारहाते हे थोर गणेश भक्त होते ते दररोज नित्यनियमांने दक्षिणगंगा गोदावरी नदीवरून गणपती - संध्या पुजाअर्चेसाठी पाणी आणत व पुजा झाल्यावरच अन्न ग्रहण करत., अशी या चिंतामणी गणपतीची अख्यायिका आहे. १९७६ पासून हे स्थान प्रकाश झोतात आले, या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे,४९ वर्ष पूर्ण झाले असून यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे, तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यकमांस व महाप्रसादास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गणेश बंधारा मंडळ व संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने करण्यांत आले आहे.