कोपरगांव ः लक्ष्मण वावरे
तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील आरोपी लिपिक चंद्रकांत नानासाहेब चांडे व योगेश दत्तात्रय पालवे यांनी आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा १५ हजार रुपये लाचेची मागणी केली व आपल्या खाजगी हस्तका मार्फत स्वीकारताना रंगेहाथ अटक केली असल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून तो त्या व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी चंद्रकांत चांडे रा.कलासाई बंगला सम्यकनगर कोपरगाव व योगेश पालवे अव्वल कारकून, तहसिल कार्यालय कोपरगाव यांनी आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
दरम्यान यातील तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार केली होती.त्यावरून दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खाजगी आरोपी इसम प्रतीक कोळपे याचेकडे देण्यास सांगितले होते.त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी ईसम प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने चंद्रकांत चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली होती.त्यानंतर आरोपी पालवे व आरोपी चांडे यांना फोनद्वारे आरोपीने खाजगी इसम प्रतीक कोळपे यांनी १५ हजार रुप्यांची लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगितले होते.दरम्यान चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली असल्याचे उघड झाले होते.त्यातून या दोन्ही आरोपींना लाच लुचपत विभागाचे मार्गदर्शक पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे,पोलिस हवालदार दिनेश खैरनार,पोलीस हवालदार गणेश निंबाळकर,पोलीस नाईक अविनाश पवार,पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींनी त्या तिघांना रंगेहाथ पकडले आहे.त्यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ व १२ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती यातील मार्गदर्शक पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे यांनी दिली आहे.दरम्यान या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे






