मारहाण प्रकरणाचा मतदानापूर्वी तातडीने छडा लावा - विवेक कोल्हे
ही घटना जाणीवपूर्वक घडवून आणली का, याचीही चौकशी झाली पाहिजे,
कोपरगाव समाचार :-शहरात एका खाजगी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेचा मतदानापूर्वी तातडीने छडा लावण्यात यावा, अशी ठाम मागणी भाजपा आणि मित्रपक्षांच्या वतीने करण्यात आली आहे. युवा नेते विवेक कोल्हे व पराग संधान आणि भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी कोपरगाव पोलीस स्टेशन येथे भेट देऊन या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास त्वरित सुरू करण्याची मागणी केली. या घटनेचा भाजपाच्या वतीने तीव्र निषेधही व्यक्त करण्यात आला.
मारहाण झाल्याची माहिती मिळालेल्या वारी येथील बाबासाहेब ठोंबरे हे जरी एका विशिष्ट संस्थेचे कर्मचारी असले, तरी त्यांचे कुटुंब कोल्हे कुटुंबाशी अनेक वर्षांपासून सामाजिकदृष्ट्या जोडलेले आहे. त्यामुळे या घटनेतील सर्व पैलू, संबंध आणि पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
निवडणुकीच्या अगदी तोंडावर अशी घटना घडल्याने शहरात विविध संशय निर्माण झाले आहेत. विकासाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, तसेच काही उमेदवारांभोवती सुरू असलेल्या गैरप्रकारांच्या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी ही घटना जाणीवपूर्वक घडवून आणली का, याचीही चौकशी झाली पाहिजे, असा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला.
हल्ला नेमका कोणी केला, त्यामागचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणणे अत्यावश्यक आहे. शहरातील शांतता आणि वातावरण दूषित करून राजकीय फायदा घेण्याचा कुणाचा डाव आहे का, या धाग्यानेही तपास व्हावा, अशी स्पष्ट भूमिका विवेक कोल्हे यांनी मांडली.कोपरगावच्या कायदा-सुव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम राहावा, यासाठी पोलिसांनी या प्रकरणात तातडीने, पारदर्शक आणि कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा भाजपाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.




