नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार योगेश वाणी यांचा पराग संधान यांना पाठिंबा
कोपरगाव समाचार:-
कोपरगाव शहरातील भारतीय जनता पक्षाचे तळागाळातील कार्य करून योगदान देणारे योगेश वाणी यांनी आपल्या परिवारासह भाजपाचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे.सातत्याने पक्षहितासाठी कार्यरत राहिलेला हा परिवार काही अपरिहार्य कारणास्तव कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी करण्याच्या विचारात होता मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या विनंतीला मान देत भाजपा आरपीआय लोकसेवा मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांना अपक्ष उमेदवार असलेल्या योगेश वाणी यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपा नेतृत्वाखाली उभे असलेल्या नगराध्यक्ष आणि सर्व 30 नगरसेवक उमेदवारांना देखील ते आता प्रचारात सक्रियपणे मदत करणार आहेत. योगेश वाणी यांनी दिलेल्या पाठिंबाच्या निर्णयामुळे कोपगावात भाजपाची ताकद वाढली असल्याचा विश्वास युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.
2 डिसेंबर रोजी निवडणूक झाली असती, तर 20 ते 25 नगरसेवक निवडून येण्याची शक्यता होती. परंतु निवडणूक पुढे ढकलली गेल्यामुळे मिळालेल्या अतिरिक्त काळाचा फायदा भाजपाला होणार असून नगराध्यक्षपदाची लीड तसेच निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या निश्चितपणे वाढेल, असे चित्र दिसत आहे. सातत्याने भाजपात होणारे पक्षप्रवेश, दोन उमेदवारांची अधिकृत माघार आणि भाजपाला दिलेला त्यांचा पाठिंबा ही सर्व लक्षणे विजयाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू असल्याचे दर्शवतात. किंबहुना, आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत, असे स्पष्ट होत आहे.
यावेळी विवेक कोल्हे यांनी योगेश वाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. वाणी यांनी यापूर्वीही विविध ठिकाणी भाजपाचा प्रचार केल्यामुळे अनेक प्रभागात त्याचा फायदा होईल आणि कमळ फुलवण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. खासदारकीला दुसऱ्या पक्षाचा खासदार निवडून आला, आमदारकीला या ठिकाणी अन्य पक्षासाठी जागा सोडावी लागली अशा सर्व परिस्थितीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष महोदयांचे अविरत मार्गदर्शन आमच्यासोबत राहिले आहे. कोपरगावात भाजपा नगराध्यक्ष निवडून आल्यास सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा-गोदावरी कोपरगावात वाहणार, असा विश्वास विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी अपक्ष उमेदवार योगेश वाणी म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.आ.स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कोपरगाव शहरात भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निर्विवाद बहुमताने निवडून यावा, सर्व नगरसेवक बहुमताने विजयी व्हावेत, असा माझा संकल्प होता. परंतु काही नाट्यमय घडामोडींमुळे निवडणुकीसाठी अपक्ष पदाचा फॉर्म भरला होता. मात्र आता मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. कोपरगाव शहरातील 30 नगरसेवक भाजपा व लोकसेवा आघाडीचे सर्व उमेदवारआणि नगराध्यक्ष, असे एकूण ‘31-0’ होण्याचा संकल्प युवा नेते विवेक कोल्हे यांचा आहे. त्या संकल्पाला पाठिंबा देऊन सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांना विजयी करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही योगेश वाणी यांनी पराग संधान यांना जाहीर पाठिंबा देताना पत्रकार परिषदेत दिली.




