संजीवनी सैनिकीचा ब्रास बॅन्ड पथक राज्यात प्रथम
विभागीय स्पर्धेत संजीवनी करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
कोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे
भारत सरकार शैक्षणिक मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण , नवी दिल्ली आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजीत राज्यस्तरीय भव्य ब्रास बॅन्ड स्पर्धा २०२५-२६ मध्ये संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅन्ड पथकाने अप्रतिम, शिस्तबध्द आणि कलात्मक सादरीकरण करून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवुन आम्ही ग्रामीण भागातील असलो तरी कोठेही कमी नाही, हे सिध्द केले. अशा प्रकारे संजीवनीने सलग दुसऱ्या वर्षीही ब्रास बॅन्ड स्पर्धेत राज्यात अव्वल असल्याचे सिध्द केले, आता संजीवनीचा संघ देश पातळीवरील विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे, अशी माहिती संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की या स्पर्धेत राज्यभरातुन एकुण ३७ संघांनी सहभाग नोंदविला. यातील बहुतांशी संघ मोठ्या महानगरी क्षेत्रातील होती. यातील सात संघ अंतिम फेरीत पोहचली. यात ग्रामीण भागातील संजीवनीचा सहभाग होता. इ. १० वी मधिल कॅडेट विपुल दिपक वाघ याच्या नेतृत्वाखाली ३७ कलांकारांनी ब्रास बॅन्ड कलेचे शिस्तबध्द व शास्त्रशुद्ध सादरीकरण करून परीक्षकांच्या विविध कसोट्या पुर्ण करून राज्य विजेतपदाची मोहर उमटवली. पश्चिम विभागात महाराष्ट्र , गुजरात,गोवा, मध्य प्रदेश , राजस्थान, दादरा नगर हवेली, दीव दमण या राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्येही जिंकायचेच, या जिध्दीने संजीवनीचे ब्रास बॅन्ड पथक सध्या सराव करीत आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, संगीत शिक्षक महेश गुरव, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, धोरण आणि वाढ अधिकारी आसिफ सय्यद यांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अतिशय प्रामाणिक मेहनत, नियमित सराव, शास्त्रोक्त मार्गदर्शन आणि जिंकण्याची जिध्द या बाबींनी संजीवनीच्या ब्रास बॅन्ड पथकाने राज्यात विजयाची मोहर उमटवली. ब्रास बॅन्ड हा सांस्कृतिक क्रीडा प्रकार आहे. यात शारीरिक क्षमतेबरोबरच कलेचे कसब लागते. इतर क्रीडा प्रकारातील राज्यस्तरीय यशस्वी विद्यार्थ्यांना शासन अधिकचे गुण देवुन त्यांना शासकीय सेवेतही आरक्षण देतेे. तशाच सवलती ब्रास बॅन्डच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. यामुळे पालक त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहित करतील व त्यांना भविष्यात अनेक संधी प्राप्त होतील. संस्थेचे संस्थापक माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दुरदृष्टी कायम संजीवनीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबर कला,क्रीडा, नेतृत्व, शिस्त अशा सर्व अंगांचा विकास करण्यासाठी संस्थेचे विशेष लक्ष आहे.विद्यार्थ्यांमधिल विविध गुण ओळखुन त्या गुणांना विकसीत केल्या जाते. या सर्व बाबींची फलश्रुती म्हणजे संजीवनीचा ब्रास बॅन्ड संघ राज्यात अव्वल ठरला आहे. राज्य स्तरीय हा विजय आम्ही स्व. कोल्हे यांच्या पवित्र स्मृतिस समर्पित करीत आहोत. -
सुमित कोल्हे, विश्वस्त





