ज्ञानेश्वर आभाळे ‘सर्वोत्कृष्ठ आसवनी व्यवस्थापक’ पुरस्काराने सन्मानित
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विविध संस्था कार्यरत असून त्यापैकी अग्रस्थानी व अग्रेसर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआय हि संस्था आहे.या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ठ आसवनी व्यवस्थापक’ पुरस्कार सहकारी साखर कारखानदारीत अग्रेसर असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर वसंतराव आभाळे यांना देवून गौरविण्यात आले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी बु.) यांच्या वतीने गळीत हंगामात जास्त ऊस उत्पादन घेणारे शेतकरी, तसेच कारखान्याच्या व्यवस्थापनात चांगले काम करणाऱ्या कार्यकारी संचालक व विभाग प्रमुखांना यामध्ये चीफ केमिस्ट, चीफ इंजिनिअर, फायनान्स मॅनेजर, आसवनी विभाग यांना दरवर्षी विविध प्रकारचे पारितोषिक देवून त्यांचा सन्मान केला जातो.यावर्षी आसवनी विभागाच्या उत्कृष्ठ व्यवस्थानाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर वसंतराव आभाळे यांना ‘सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार’ माजी केंद्रीय कृषी मंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय) चे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे. रोख एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील,आ.जयंतराव पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष मा.आ.हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर वसंतराव आभाळे यांचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व अध्यक्ष आ.आशुतोष काळे, उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण सर्व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.







